सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 19, 2010 AT 01:00 AM (IST)
पानिपताच्या महासंग्रामाला येत्या जानेवारीत अडीचशे वर्षे पूर्ण होत आहेत अन् मराठी वाङ्मयात इतिहास घडविणाऱ्या "पानिपत' कादंबरीची तिसावी, खास स्मृतिविशेष आवृत्ती राजहंस प्रकाशन उद्या (२० डिसेंबर) प्रकाशित करत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर ज्याचा ऊर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपताचे नाव घेताच ज्याला दु:खाने हुरहूर लागत नाही, तो मराठी मनुष्यच नव्हे! यानिमित्ताने कादंबरीकार विश्वास पाटील यांनी जागवलेले हे ध्यासपर्व!
पानिपत या चारअक्षरी शब्दांशी माझ्या श्वासाचे आणि माझ्या धमन्यांतून वाहणाऱ्या रक्ताचे असे कोणते विलक्षण नाते गुंफले गेले आहे, कोणास ठाऊक! वयाच्या ऐन पंचविसाव्या वर्षी या विषयावर कादंबरी लिहिण्याच्या इराद्याने मी साधनसामग्री गोळा करू लागलो अन् वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी कादंबरीचे प्रत्यक्ष लेखन मी हातावेगळे केले.
याच विषयाच्या निमित्ताने एक ऐतिहासिक किस्सा आठवतो. यशवंतराव चव्हाण तेव्हा भारताचे संरक्षणमंत्री होते, त्यांच्या मोटारींचा ताफा पंजाबातून दिल्लीकडे येत होता. रस्त्यात एका मोठ्या गावात "पानिपत' नावाचा नामफलक त्यांना दिसला. आपला प्रवास खंडित करून जेथे पानिपताचा समरप्रसंग घडला, त्या "काला आम' नावाच्या ठिकाणी ते गेले. तेथे मराठी वीरांच्या काळ्या ओबडधोबड दगडी समाधीच्या समोरच त्यांनी शेतात अचानक बसकण मारली. त्या रानची पांढुरकी माती त्यांनी आपल्या दोन्ही मुठींमध्ये धरली व कविहृदयाचे यशवंतराव हमसून हमसून रडू लागले. त्यांची ही अवस्था पाहून सोबतचा स्टाफ आणि लष्करी अधिकारी यांची तारांबळ उडाली. भावनेचा पहिला पूर ओसरल्यावर आपल्या ओघळत्या अश्रूंना कसाबसा बांध घालत यशवंतराव उपस्थितांना सांगू लागले, ""दोस्तहो, हीच ती पवित्र माती. राष्ट्रसंकट उद्भवल्यावर त्याविरोधात लढावे कसे, शत्रूला भिडावे कसे, याचा धडाच लाख मराठा वीरांनी पानिपताच्या या परिसरात गिरवला आहे. आमच्या महाराष्ट्रभूमीतल्या प्रत्येक घराघरामधला वीर इथे कोसळला आहे. त्यांच्या रक्ता-मांसानीच या मातीचे पवित्र भस्मात रूपांतर झाले आहे!''
अगदी अलेक्झांडरपासून बाबर ते अब्दालीपर्यंत हिंदुस्थानवर आक्रमणे व्हायची ती याच रस्त्याने. अफगाणिस्तानातून, पंजाबातील सरहिंदकडून दिल्लीकडे सरकणारा हा रस्ताच जणू अनादी काळापासून रक्तासाठी चटावलेला आहे. पानिपतापासून अवघ्या काही कोसांच्या अंतरावर कुरुक्षेत्राची रणभूमी आहे. पानिपताचे तिसरे युद्ध अफगाण घुसखोर अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान बुधवार, तारीख १४ जानेवारी १७६१ या दिवशी घडले. मध्ययुगीन कालखंडात सकाळी नऊ वाजल्यापासूनच संध्याकाळी साडेपाचपर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असे भयंकर, घनघोर, जीवघेणे युद्ध घडल्याचे आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसे आणि ऐंशी हजार जनावरे मेल्याचे दुसरे उदाहरण नाही. अलीकडे हिरोशिमा आणि नागासाकीवर दोन अमेरिकन अणुबॉंब पडले. त्यांच्या किरणोत्साराचा परिणाम होऊन एक-दीड लाख जीव मरायलाही दोन-तीन दिवस लागले होते. दिल्लीच्या बादशहाच्या म्हणजेच हिंदुस्थानच्या रक्षणाच्या उद्देशाने १७५२ च्या "अहमदिया करारा'नुसार मराठे एका ध्येयाने प्रेरित होऊनच पानिपतावर गेले होते. इथेच आमच्या लक्षावधी माता-भगिनींच्या बांगड्यांचा चुराडा झाला. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माजघरातल्या कुंकवाचा करंडा पानिपतावर लवंडला.
तेव्हा महाराष्ट्रात असे एकही देवघर शिल्लक उरले नसेल की, जिथल्या देवी-देवतांनी पानिपतावर खर्ची पडलेल्या वीरांसाठी आपले चांदीचे डोळे पुशीत अश्रूंचा अभिषेक केला नसेल!
माझ्या कादंबरीलेखनाच्या दरम्यान, ""तू पुणेकरांना मोठे करण्यासाठी "पानिपत' लिहिलेस काय?'' अशा शब्दांत मला दटावण्याचा प्रयत्न केला गेला. मी त्यांना म्हणालो, ""माझ्या डोळ्यांसमोर ना कोणी पुणेकर होते; ना कोणी सातारकर. पंढरीच्या वेशीमध्ये आषाढी-कार्तिकीला मराठा मातीतल्या साऱ्या दिंड्या-पताका एक व्हाव्यात तशा पानिपतावर शत्रूच्या बीमोडासाठी अन् राष्ट्राच्या संरक्षणासाठी एक झालेला मराठी मुलूख उभा होता!''
जेव्हा पुण्याची लोकसंख्या वीस-बावीस हजारांच्या वर नव्हती, तेव्हा लाखभर मराठे कंबर कसून इथे उभे ठाकले होते. त्यामध्ये भाऊसाहेब, विश्वासरावांसह सात-आठ ब्राह्मण सरदार आणि फक्त मराठा समाजातीलच नव्हे, तर बहुजन समाजातील, अठरा पगड जातीचे, मातीचे, साठ ते सत्तर बिन्नीचे सरदार त्या समरांगणात जिवापाड लढले होते. त्या वेळच्या शाहिरांच्या पोवाड्यातील फक्त आडनावांच्या यादीवरूनच नजर फिरवा, त्याचा जरूर पडताळा येईल.
शिवाजीमहाराजांच्या काळातील आणि शिवाजीमहाराजांच्या नंतरच्या काळातील सामान्य घरांतील सामान्य माणसे असामान्यपदाला पोचल्याची अनेक उदाहरणे पानिपतप्रसंगी आढळतात. पुणे जिल्ह्यातील नीरेकाठच्या होळच्या धनगराचा पोर मल्हारी सरदार मल्हारराव होळकर बनला. साताऱ्याकडचा कण्हेरखेडचा राणोजी शिंदे, त्याचा भाऊ दत्ताजी, पुणे जिल्ह्यातील दमाजी गायकवाड याच मंडळींनी पानिपतानंतर इंदूर, ग्वाल्हेर आणि बडोद्याकडे आपल्या पराक्रमाने राज्ये उभारली. एक प्रकारे आधी पानिपताच्या मातीला रक्ताचा नैवेद्य अर्पण केल्यावरच उत्तर हिंदुस्थानाच्या राजकारणाच्या गुरुकिल्ल्या त्यांच्या हाती लागल्या.
पानिपत ही ऐन यौवनातल्या, मस्तवाल फाकड्या वीरांनी छेडलेली जीवघेणी जंग होती. आमचा शत्रू अहमदशहा अब्दाली हा तेव्हा जगातल्या बलाढ्य योद्ध्यांपैकी एक प्रबळ सेनानी आणि राजकारणी होता. या युद्धाच्या वेळी त्याची उमर अवघी बत्तीस होती; तर भाऊसाहेब पेशव्यांचे वय अठ्ठावीस होते. दत्ताजी शिंदे बाविशीचा, विश्वासराव आणि जनकोजी शिंदे तर सतरा वर्षांची मिसरूड फुटल्या वयाची पोरे होती. जेव्हा देशातील कोणत्याही नदीवर आजच्यासारखे पूल, रस्ते वा वाहतुकीची साधने नव्हती, तेव्हा सुमारे साठ हजार घोड्यांसह लाखाचा सेनासागर घेऊन बाहेर पडणे, या खायच्या गोष्टी नव्हत्या.
आम्ही झुंजलो दिल्लीच्या बादशहासाठी, हिंदुस्थानाच्या अभिमानासाठी. मात्र, दुर्दैवाने उत्तरेतल्या राजांनी मराठ्यांना मदत केली नाही. रजपूत राजे राजस्थानाच्या वाळूत लपून बसले. दुर्दैवाने या महायुद्धाच्या आधी काही दिवस आम्हाला वाट्टेल ते करून धनधान्याची रसद गंगा-यमुनेच्या अंतर्वेदीतून पुरवणारा गोविंदपंत बुंदेले ठार झाला अन् तेथूनच अवकळा सुरू झाली. तरीही भाऊसाहेब पानिपताच्या मातीत गाडून उभे होते. मात्र, श्रीमंत नानासाहेब पेशवे कर्तव्याला जागले नाहीत. पुण्याहून कुमक आली नाही. पतियाळाचा अलासिंग जाट पंजाबातून कुमक पाठवत होता, ती पुढे कमी पडली. स्त्रिया-पोरांचे, यात्रेकरूंचे लटांबर सोबत असणे हे काळरूढीनेच भाऊंच्या पाठीवर लादलेले ओझे होते; पण त्यामुळे मात्र हातातल्या सपासप चालणाऱ्या तलवारीच्या पात्याने तिळभर विश्रांती घेतली नाही.
शेवटी अन्नानदशा झालेली मराठी सेना झाडांची पाने आणि नदीकाठची शाडूची माती खाऊन तरली. कळीकाळाला भिडली. पानिपतावर मराठे कसे लढले, यासाठी दुसऱ्या कोणा ऐऱ्यागैऱ्याची साक्ष काढण्याचे कारण नाही. ज्याच्याविरुद्ध आम्ही जंग केली, त्या आमच्या महाशत्रूनेच, पाच-सात देशांच्या सरहद्दी मोडणाऱ्या अहमद अब्दालीनेच लिहून ठेवले आहे ः ""दक्षिण्यांनी (मराठ्यांनी) पानिपतावर मजबूत छावणी कायम केली होती. युद्धादिवशी त्यांनी अत्यंत निकराने आमच्या लष्करावर पुन्हा पुन्हा हल्ले चढविले. मराठ्यांचे हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तुम आणि इस्किंदारसारखे (अफगाणांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्याने तोंडात बोटे घालून चावली असती! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतके शौर्य इतरांकडून होणे वा दिसणे अशक्य!''
"पानिपत' कादंबरीसाठी प्रचंड पूर्वतयारीचे जोखड उचलताना आणि प्रत्यक्ष लेखन करतानाही जणू मी स्वत:च पानिपतावर अडकून पडलेला एक लढवय्या, चिवट मराठी सैनिक आहे, अशा तडफेने लढत होतो! तेव्हा सरकारी अधिकारी या नात्याने पुण्यात वास्तव्य होते. महाराष्ट्र शासनाने नुकताच पाच दिवसांचा आठवडा सुरू केला होता. मी दर शुक्रवारी सायंकाळी आयबी तथा इन्स्पेक्शन बंगलानामक सरकारी विश्रामगृहातील एका खोलीत जाऊन स्वत:ला बंद करून घेत असे. सोमवारी सकाळी तिथून किमान साठ ते सत्तर पानांचा सलग मजकूर घेऊनच मी उल्हसित मनाने बाहेर पडत असे.
इतर दिवशी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून मी सरळ इतिहास संशोधक मंडळाच्या ग्रंथालयात जाई. नित्यनेमाने तेथे तीन तास बसे. रात्री हलके जेवण करून मी झपाटल्यासारखा बेडरूममध्ये येरझाऱ्या घालत राही. समरप्रसंगी भाऊसाहेब काय म्हणाले असतील, त्यावर अब्दालीचे उत्तर, नजिबाच्या कागाळ्या, नाट्यप्रवेशच सादर केल्यासारखा मी खोलीत फिरत संवाद बोलत राही. रात्री अकराला झोपायचे की लगेच पहाटे चारला उठून प्रत्यक्ष लेखन सुरू. या अतिश्रमांनी अधेमध्ये माझ्या प्रकृतीवर परिणाम होई. एकदा छातीत दुखू लागल्याने ससूनमध्ये दाखल झालो होतो. माझे लग्न होऊन दीड वर्ष लोटलेले. तेव्हा अबोल दिसणाऱ्या माझ्या पत्नीने-चंद्रसेनाने-हॉस्पिटलमध्ये माझा हात पकडला. आपल्या डोळ्यांत पाणी आणून ऐतिहासिक थाटात, घोगऱ्या आवाजात ती हळूच मला म्हणाली, ""इकडून पानिपतावर चुरडल्या गेलेल्या बांगड्यांचा हिशेब जरूर मांडावा; परंतु पानिपत लिहीत असताना माझे "पानिपत' होऊ देऊ नये!''
कादंबरीचे आताचे लेखन सुरू करण्यापूर्वी सहा-सात महिने आधीही मी एकदा लेखनप्रपंच मांडला होता. चांगली साठ-सत्तर पाने लिहिली होती; पण माझे मन आतून खाऊ लागले. पानिपताची कडवी जंग ज्या तडफेने मांडायला हवी, तशी ती साधत नव्हती. त्यामुळे ती आरंभीची साठ-सत्तर पाने मी बाजूला भिरकावली. पुन्हा चिंतन, मनन, संशोधन सुरू केले. साधारणतः नोव्हेंबर १९८७ च्या दरम्यान आतून शब्दवेणा खूप ढुसण्या देऊ लागल्या. या प्रसूतीशिवाय मी जगूच शकत नाही, याची खात्री झाली. मग सलग सहा-सात महिन्यांत, नोकरीत रजा न घेताही रात्री-बेरात्री जागून मी कादंबरीचे एकटाकी लेखन पार पाडले.
या लेखनाच्या वेळी माझे जागृत मन, प्रचलित मराठी ऐतिहासिक कादंबऱ्यांचेही निरीक्षण करत होते. ऐतिहासिक कादंबरी म्हणजे मोठी आलंकारिक भाषा, वस्त्रांची रसाळ वर्णने, युद्धभूमी सोडून माजघरात आपल्या स्त्रियांशी अखंड चर्चा करत बसणारे वीर, असे होता कामा नये. पानिपत हा रणदेवतेचा विषय होता. त्यामुळेच मी जाणीवपूर्वक माजघरातल्या झोपाळ्यावरच्या गप्पाटप्पांत अडकलेली ऐतिहासिक कादंबरी रणावरच्या उन्हामध्ये घेऊन जायचे ठरवले! शिवाय या विषयाच्या पोटातच तीन महान वाङ्मयप्रकार सामावल्याची जाणीवही एकीकडे मला होत होती. उदगिरीपासून ते पानिपतापर्यंतची निबिड अरण्यातून मराठा लष्कराने केलेली वाटचाल हा एक उत्तम प्रवासवर्णनाचा भाग होता. अब्दाली आणि भाऊसाहेबांच्या एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या फौजा, त्यांच्या छावण्यांतले बदल, डाव-प्रतिडाव अशा संघर्षाचे एक अप्रतिम नाटक आणि युद्धोत्तरही भारलेले पानिपताचे धगधगते रणांगण हा एक महाकादंबरीचा विषय होताच.
"बचेंगे तो और भी लडेंगे' असे म्हणत काळाला सामोऱ्या जाणाऱ्या दत्ताजी शिंदेंच्या बुऱ्हाडी घाटच्या लढाईची मी जोरकस तयारी केली होती. संदर्भ, संवाद आणि व्यक्तिरेखांचे ढग मेंदूमध्ये गच्च भरून आले होते. मात्र, अचानक वाढलेल्या सरकारी कामामुळे प्रत्यक्ष लेखनासाठी वेळ मिळेना. रजाही मंजूर होईना. त्यादरम्यान पुण्याहून मंत्रालयात अनेकदा मीटिंगला यावे लागे. मात्र, मानगुटीवर बसलेल्या दत्ताजीची नशा खाली उतरत नव्हती. दरम्यान, एक दिवस डेक्कन क्वीनने मुंबईच्या दिशेने प्रवास करत होतो. फर्स्ट क्लासमध्ये भोजनासाठी समोरच्या खुर्चीपाठी जो लाकडी पाट असतो, त्यावरच मी कागदांची चवड ठेवली अन् पुण्यापासून मुंबईपर्यंतच्या प्रवासात बुऱ्हाडी घाटचे ते आख्खे प्रकरण एकटाकी लिहून पूर्ण केले. घाईगर्दीत उतरलेले ते प्रकरण वाचकांना खूप भावले आहे.
माजगावकरांआधी चार-पाच प्रकाशकांनी हस्तलिखित पाहिले होते. म्हणजे पाहिलेच होते! एक नवखा लेखक मोठाल्या पाच फायली भरून लिहिले तरी काय दिवे लावणार आहे, अशा हिशेबाने कोणी गांभीर्याने हस्तलिखितच उघडले नव्हते, हे नंतर समजले. "चलो दिल्ली'च्या निमित्ताने आनंद यादवांनी दिलीपरावांची ओळख करून दिलेली. त्यांच्या ऑफिसमध्ये मी बळे बळे अनेकदा घुसायचो. दरम्यान, माजगावकरांनी कष्टाने उभारलेल्या "नेहरू डायरी'ची कल्पना केंद्र शासनानेच मदत करण्याऐवजी ढापली. त्यांच्या या मन:स्थितीत मी दबक्या आवाजात "पानिपता'वर काही लिहिल्याचे हळूच सांगितले. त्यांनी हस्तलिखित मुद्दाम मागवून घेतले, वाचले आणि चष्म्यांच्या काड्यांतून माझ्याकडे पाहत, ""ते (मराठे) हरले, तुम्ही जिंकलात'' असे खुशीने सांगितले. कादंबरीची तडाखेबंद जाहिरात केली. मला आठवते त्याप्रमाणे त्यांनी ग्रंथनिर्मितीसाठी बॅंकेतून कर्ज उचलले होते. "कशासाठी एका नवख्या घोड्यावर एवढे पैसे लावता?' अनेक जण त्यांना विचारायचे. मात्र, "बघू, इस पार या उस पार' ते उत्तर द्यायचे.
प्रसिद्ध चित्रकार रवींद्र मेस्त्रींनी, मधुमलाईच्या जंगली मोहिमेवर असताना, त्या वास्तव्यातच "पानिपत'चे सुंदर मुखपृष्ठ चितारले. १९८८ च्या पर्जन्यमासात मी, पुण्याचे तेव्हाचे जिल्हाधिकारी श्रीनिवास पाटील, दगडूशेठ हलवाईच्या गणपती मंदिरात गेलो होतो. गणेशाचे आशीर्वाद घेऊन मुद्रणाला प्रारंभ झाला. माझ्या आणि माजगावकरांच्या जवळजवळ रोज सकाळी भेटी व्हायच्या. आम्ही शनिपाराच्या आसपासच्या रेस्टॉरंटमध्ये कुठेतरी मिसळ खायचो. यशाबद्दल एकीकडे शंकाही वाटायची; पण सुगरणीने फोडणी दिली की तिच्या स्वयंपाकाचा सुगंध गल्लीत लपून राहत नाही, तसे झाले. स्वस्तिक मुद्रणालयातील रायरीकर पिता-पुत्रांपासून जुळाऱ्यांपर्यंत सारे बोलू लागले, ""कादंबरी भन्नाट आहे. उड्या पडतील.''
"पानिपत'चे तमाम मराठी वाचकांनी भरभरून स्वागत केले. कादंबरीवर अक्षरश: उड्या पडल्या. ग्रंथालयातील प्रती पुरेशा पडायच्या नाहीत. त्यामुळे अधीर वाचकांनी अनेक ठिकाणी बाइंडिंग उसवून फॉर्म्स वेगवेगळे केले. एका वेळी एक प्रत तिघे-चौघे जण वाचताहेत, अशीही दृश्ये पाहावयास मिळाली. दिलीपरावांच्या धाकट्या भगिनी अलका गोडे तेव्हा कौतुकाने बोलायच्या, ""काय कादंबरी लिहिलीत हो! पाच-सात आवृत्त्या झाल्या तरी "पानिपत'च्या प्रतींनी अजून गोडाऊन पाहिलेले नाही. अशा आल्या की अशा पटकन दुकानात जातात.'' पुढे काही नतद्रष्टांनी या लठ्ठ कादंबरीचीसुद्धा पायरसी करून आपले पोट जाळायचा निंद्य प्रकारही केला.
लोकमान्यतेबरोबरच "पानिपत'ने विद्वानांच्या पगड्याही हलवल्या. शांता शेळके, शिवाजी सावंत, ग. वा. बेहरे, म. द. हातकणंगलेकर आदींनी भरभरून परीक्षणे लिहिली. पैकी बेहरे पायाच्या व्याधीने रुग्णालयात होते. तरी त्यांनी तेथे मला मुद्दाम पाचारण करून शाबासकी दिली. ""तुम्ही चितारलेला इब्राहिमखान गारद्याच्या मृत्यूचा प्रसंग वाचताना अंगावर सरसरून काटा उभा राहतो. श्रेष्ठ कादंबरीकारासाठी आवश्यक असे सारे गुण तुमच्या लेखणीत आहेत. जपा त्यांना.''
तिकडे नाशकाहून वि. वा. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांनी खास प्रशंसा केली. तात्यासाहेब शिरवाडकरांनी लिहिले, ""पानिपताचा आवाका गगनाला गवसणी घालण्यासारखा आहे. कलम तुमच्यावर प्रसन्न आहे. खूप लिहा.'' या विषयावर शिरवाडकरांनाच एक कादंबरी लिहायची होती, असे त्यांनी प्रत्यक्ष भेटीत मला सांगितले. १९५८ च्या दरम्यान वि. स. खांडेकरांनी एक लेख लिहिला होता. त्यात म्हटले होते, की येत्या काही वर्षांत "पानिपत' या विषयावर एखादी दमदार कादंबरी लिहून नव्या पिढीचा एखादा कादंबरीकार जोमाने साहित्यक्षितिजावर पुढे येईल.
आता बावीस वर्षांनंतर खांडेकरांचे भाकीत माझ्या बाबतीत खरे घडले, असे म्हणायला हरकत नाही. माझ्यासारख्या खेड्यापाड्यातून पुढे आलेल्या नवागतांवर शिरवाडकर आणि कानेटकर अशी स्तुतिसुमने उधळत होते. ती तारीफ अनेक ज्येष्ठांना रुचायची नाही. या कादंबरीच्या यशाची कमान चढती राहिली. त्याच वेळी दुर्दैवाने मराठीतील काही ज्येष्ठ साहित्यिक तिच्या कीर्तीचे पंख छाटायचा छुपा, शिस्तबद्ध आणि सातत्याने प्रयत्न करतच होते. तरीही या कलाकृतीने अडथळ्यांच्या अनेक शर्यती पार पाडल्या. हे मी माझे नशीब समजतो.
या कादंबरीच्या निमित्ताने सदाशिवरावभाऊ यांची एक लेचापेचा, नवशिका सेनापती अशी जनामनात रुजवली गेलेली प्रतिमा पार पुसून गेली. पानिपत म्हणजे केवळ एक अशुभ घटना, बाजारगर्दी अशा रूढ कल्पनांनाही धक्का बसला. पानिपत हे त्या अर्थी पानिपत नसून तो एक "पुण्यपथ' असल्याचा साक्षात्कार लोकांना हळूहळू का होईना होऊ लागला आहे.
गतवर्षी माझ्या वडिलांच्या अस्थिविसर्जनाच्या निमित्ताने मी हरिद्वारला गेलो होतो. तेव्हा शेजारच्याच पानिपत परिसरातून नव्याने हिंडून आलो. युद्धाच्या वेळची शुक्रताल, बडौत, नजिबाबाद, कुंजपुरा ही ठाणी आणि जुन्या खाणाखुणा अजूनही तशाच आहेत. पानिपत जिल्ह्यातील एका गावाचेच नाव भाऊपूर असे आहे. मराठ्यांचा दारुण पराभव होऊन काही हजार कुटुंबे पळापळीनंतर उत्तरेतच स्थायिक झाली. कर्तृत्ववान बनली. त्यापैकी काही जणांनी उत्तर प्रदेशासारख्या बलाढ्य राज्याच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. पानिपताच्या युद्धाच्या वेळी आपले बापजादे यमुनाकाठी घिसाडघाईने कपाळमोक्ष करून घेण्यासाठी आले नव्हते, तर इकडे राष्ट्राच्या उत्थानासाठी आले होते, याच नवजाणिवेने आता तिकडे स्थलांतरित मराठ्यांमध्ये नवजागृतीची लाट आली आहे. युद्धाच्या वेळी मराठी लष्कराने पानिपताच्या किल्ल्यात रोजच्या पूजेसाठी भवानीचे छोटेसे मंदिर बांधले होते. त्याचा गेल्या वर्षी जीर्णोद्धार झाला आहे. अगदी शेवटच्या क्षणी केवळ अल्लातालाच्या कृपेने अब्दालीला तेव्हा तो विजय मिळालेला होता, त्याचे निशाण उराशी कवटाळताना त्याला धाप लागली होती. खणाणत्या, जिगरबाज मराठा तलवारींची त्याने एवढी दहशत खाल्ली होती की, विजयी होऊनसुद्धा पुन्हा हिंदुस्थानावर आक्रमण करायचे त्याला धाडस राहिले नाही. आज अडीचशे वर्षांच्या दीर्घ पल्ल्यानंतरही या परिसरातले जोगी जमातीचे शाहीर आम्ही केव्हाच वेड्या ठरवलेल्या भाऊसाहेब पेशव्यांचेच पोवाडे आजही गातात; अब्दालीचे नव्हेत! पराजयाचा कलंक लागूनही कळीकाळानेच जणू भाऊसाहेबांना अमरत्वाच्या सिंहासनावर आरूढ केले आहे. आज "रोड मराठा' या नावाने आपले बांधव त्या दूरदेशी लाखालाखांच्या संख्येने एकत्र येऊ लागले आहेत. हरियानात मेळावे भरवू लागले आहेत. मराठी आणि हिंदीसह गेल्या बावीस वर्षांत पानिपत कादंबरीची पताकाही फडकतच राहिली आहे.
आता तिसाव्या खास आवृत्तीच्या निमित्ताने माजी पंतप्रधान नरसिंह राव आणि नाट्यनिर्माते मोहन वाघ या दोघांची प्रकर्षाने आठवण होते. नरसिंह राव पंतप्रधान व्हायच्या आधी भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष होते. तेव्हा काही कामानिमित्त ते मुंबईत आले होते. मराठीचा व्यासंग असलेल्या रावांनी "महाराष्ट्र टाइम्स'मध्ये हेरवाडकरांनी लिहिलेले "पानिपत'चे परीक्षण वाचले अन् मुद्दाम बाजारातून प्रत मागवून ती झपाटून वाचली. अन् लगेचच ही कादंबरी भारतीय ज्ञानपीठातर्फे हिंदीमध्ये प्रकाशित करावयाची व्यवस्था केली. त्यांच्यासारख्या जागरूक साहित्यप्रेमीमुळेच माझ्यासाठी हिंदी वाचकांचा महादरवाजा उघडला गेला. मोहन वाघांनी या कादंबरीवर माझ्या खनपटीला बसून "रणांगण' नावाचे नाटक लिहून घेतले. गाजवले. आज मराठी पडद्यावर आणि अनेक चॅनेल्सवर चमकणारे अनेक तारे "रणांगण'चीच देन आहेत. आज नावाप्रमाणेच वाघ असणारे मोहन वाघ हयात असते तर पानिपताच्या महासंग्रमाला अडीच शतके पार पडल्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा रंगभूमीवर "रणांगणा'ची शहादणे आणि तुताऱ्या नक्कीच निनादून सोडल्या असत्या.
तिसाव्या खास आवृत्तीच्या निमित्ताने प्रकाशक दिलीप माजगावकर, सौ. माजगावकर आणि या कादंबरीच्या हस्तलिखिताची पहिली शंभर पाने वाचल्यापासून कादंबरीची कणखरपणे पाठराखण करणारे शंकर सारडा या सर्वांचे ऋण मानावेत, तेवढे थोडेच आहेत.
"पानिपत'ला प्रियदर्शिनी पुरस्कार, गोव्याचा नाथ माधव पुरस्कार, कोलकत्याच्या भाषा परिषदेच्या पुरस्कारासह पस्तीसहून अधिक पुरस्कार लाभले. लक्ष लक्ष वाचकांचा आशीर्वाद मिळाला. यानिमित्ताने रेसाईड नावाच्या आंग्ल विद्वानाची आठवण होते. "पानिपत' वाचून त्यांनी मला सांगितले, ""दुसऱ्या महायुद्धात आम्ही लंडनवासियांनी लढवलेली "बॅटल ऑफ ब्रिटन' अशीच होती. तेव्हा आमचा खात्मा करण्यासाठी चहूबाजूंनी अग्निवर्षाव करत जर्मनीची विमाने आमच्या लंडननगरीवर पुन: पुन्हा चाल करून येत असत. तुमच्या पानिपतावरच्या चिवट योद्ध्यांप्रमाणेच आम्ही थेम्स नदीकाठी आणि लंडनमध्ये घराघरात भुयारे खोदून जंग खेळलो. आगीच्या लोळात अनेकदा भाजून निघालो. मात्र, पानिपताच्या धुरा-धगीच्या कल्लोळात झुंजल्या गेलेल्या महासंघर्षाला योग्य तो न्याय देणारी समर्थ लेखणी तुमच्या निमित्ताने मराठी भाषेला मिळाली. त्या तोडीचे कलम अद्याप आम्हाला मिळालेले नाही.'' रेसाईडसाहेबांचे ते शब्द ऐकून मी खूप भारावून गेलो होतो. एखाद्या लेखकाला यापेक्षा अधिक कोणते मोठे पारितोषिक मिळू शकते बरे?
सौजन्य ः "पानिपत' कादंबरी, राजहंस प्रकाशन.
No comments:
Post a Comment